जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्यात निषेध करण्याचा इशारा देणार्या मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
याबाबत वृत्त असे की, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांनी कालच एका निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला होता. सूडाच्या भावनेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने केलेली चौकशी, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना झालेली अटक, जळगावातील समांतर रस्त्यांचा चिघळललेला प्रश्न आणि हुडकोच्या कर्जफेडीतील जाचक अटींच्या पार्श्वभूमिवर, हा निषेध करण्यात येणार असल्याचे विनोद शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल होण्याआधीच मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत चार अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.