मुंबई (वृत्तसंस्था) कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र, मनसे अशा नोटीशीला भीक घालत नाही, अशी पहिली प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत. तुमच्या विरोधात बोलेल, तुमची प्रकरणं बाहेर काढेल, तुमचा खोटारडेपणा बाहेर काढेल त्याच्यावरुद्ध दाबावतंत्राचा वापर करायची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. सीबीआय असेल किंवा ईडी असेल या आता स्वायत्त संस्था राहिलेल्या नाहीत तर त्या भाजपाच्या कार्यकर्त्या झालेल्या आहेत. अशा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी कसे डील करायचे हे मनसेला चांगले माहितीय. त्यापद्धतीनेच आम्ही डील करु, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान राज ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या या नोटीशीवरुन सरकार सूडबुद्धीचे राजकारण करत असून हा लोकशाहीच्या गळचेपी करण्याचा प्रकार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.