चाळीसगाव, प्रतिनिधी । खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेश्या प्रमाणात खते विशेषतः युरिया उपलब्ध न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला असताना चाळीसगाव तालुक्यातील निवडक कृषी केंद्रांवर आज दि.२२ रोजी युरिया उपलब्ध झाल्याचे कळताच शेतकऱ्यांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याचे कळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी भर पावसात कृषी केंद्रांवर धाव घेत राज्य सरकारने पुरेश्या प्रमाणात खते उपलब्ध न करून दिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला.
तालुक्यातील निवकडं कृषी केंद्रांवर आज युरिया पोहचला तर अजून काही कृषी केंद्रांवर पोहोचला नाही म्हणूनती बंद होती. घाट रोड वरील सुयोग कृषी केंद्रावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. त्यातच अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी भर पावसात उभे असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळताच त्यांनी तात्काळ सुयोग कृषी केंद्र गाठत शेतकऱ्यांना धीर दिला. आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषी केंद्र संचालक यांना बोलावत दुकान उघडण्याच्या सूचना दिल्या व शेतकऱ्यांच्या पावत्या तयार करून त्यांना युरिया देण्याच्या सूचना दिल्या. स्वतः आमदार आपल्यासाठी भर पावसात धावून आल्याचे पाहून शेतकऱ्यांना देखील धीर आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, एकीकडे कोरोनापासून बचावासाठी सरकार सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सांगत असतांना मात्र दुसरीकडे युरियाच्या २ गोण्यांसाठी भर पावसात जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागत आहे. मागील ५ वर्षात कधीही शेतकऱ्यांना खतांची अडचण आली नाही. मी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. येत्या काळात शेतकऱ्यांना पुरेश्या प्रमाणात खते व युरिया उपलब्ध न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, चेतन पाटील आदी उपस्थित होते.
आमदारांनी स्वतः बनवल्या पावत्या
भर पावसात उपाशीपोटी उभे असणाऱ्या शेतकरी बांधवांची व्यथा पाहून आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील पुढाकार घेत स्वतः सुयोग कृषी केंद्राच्या काउंटरवर बसून युरिया बिलाच्या पावत्या बनवायला सुरुवात केली. आमदारांनी घेतलेला पुढाकार पाहून कृषी केंद्राच्या संचालकांनी देखील अतिरिक्त यंत्रणा लावत रांगेत उभ्या असणाऱ्या शेतकऱ्यांना बिले देण्यास सुरुवात केली.
निवडणुकीत पावसात भिजणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणाव्यात – उपस्थित शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
सकाळी ८ वाजेपासून रांगेत भर उन्हात आणि नंतर भर पावसात उभे आहोत, पोटात अन्नाचा कण नाही. प्यायला पाणी नाही. गेल्या ५ वर्षात खतांसाठी अशी वेळ आमच्यावर आली नाही. आमची अवस्था पाहून येणारे जाणारे आमच्यावर हसत आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी बनणाऱ्या व पावसात भिजणाऱ्या राज्यकर्त्यांनी जरा आमच्या व्यथा जाणाव्यात अश्या भावनिक व संतप्त प्रतिक्रिया कृषी केंद्रांवर रांगेत उभे असणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. अनेक महिला, वृद्ध व अपंग शेतकरी युरिया घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले.
भाजपातर्फे शेतकऱ्यांना चहा – बिस्किटे वाटप
जगाच्या पोशिंदा व अन्नदाता म्हटला जाणारा बळीराजा २ बॅग युरीयासाठी सकाळी ८ वाजेपासून उपाशीपोटी उभे असल्याचे पाहून व्यथित झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या सूचनेवरून स्थानिक भाजपा पदाधिकारी यांनी चहा व बिस्किटे आणून वाटप केली. भाजपचे सचिन दायमा, सम्राट सोनवणे, राजेंद्र कवडे यांनी यासाठी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/279752213322527/