यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे येथील स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर यावल-रावेर मतदारसंघाचे आ. अमोल जावळे यांनी यावल एसटी आगारात प्रत्यक्ष भेट देऊन महिला प्रवाशांशी संवाद साधला. बसमध्ये चढताना किंवा आगारात काही अडचणी येतात का, याबाबत त्यांनी महिलांशी चर्चा केल्याचे पहायला मिळाले.
आ. अमोल जावळे यांनी संध्याकाळी यावल एसटी आगारात भेट दिली. या ठिकाणी आलेल्या १० नवीन बसची पाहणी केली. यावेळी एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे, भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष मुकेश कोळी, भूषण फेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावल एसटी आगारात नवीन कॅमेरे बसवण्याबाबत दिलीप महाजन यांनी आमदारांना माहिती दिली. त्यानंतर आमदार अमोल जावळे यांनी बसमध्ये चढून महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांशी संवाद साधला. मुंबईतील स्वारगेट घटनेबाबत त्यांनी महिलांशी चर्चा केली. छेडछाडीचे प्रकार वाढले असून, महिलांच्या मंगळसूत्रांवर हल्ले होत आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात, मात्र आरोपी सापडत नाहीत. महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत, अशी तक्रार महिलांनी केली. बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त हवा, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार अमोल जावळे यांनी यावलच्या पोलीस निरीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून स्वारगेटसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले आहे.