
औरंगाबाद, वृत्तसंस्था | राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आमदार दिलीप सोपल यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोपल हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

सोपल यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळ येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. बागडे यांनीही सोपल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यावेळी सोपल यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार आंबादास दानवे उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर येत्या दोन दिवसात सोपल हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, माजीमंत्री सचिन अहिर यांच्या पाठोपाठ सोपल यांनीही शिवसेनेची वाट धरल्याने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.


