अमळनेर प्रतिनिधी । आपल्या मागणीनुसार अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत दुसरे आवर्तन सोडण्यास मंजुरी मिळाली असल्याने पाणी टंचाईवर मात करता येणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.
अमळनेर तालुक्यातील ४० ते ५० टंचाईग्रस्त गांवाना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून सदर टँकर पांझरा नदी काठावरील विहिवरून भरण्यात येत होते, परंतु पांझरा काठावरील जलपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने या गांवाना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. यामुळे या परिसरातून टँकर भरण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर मात करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन मिळावे अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जळगाव आणि धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याला मान्यता मिळाली असून लवकरच अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. आवर्तन सोडताना जुलै पर्यंत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले असल्याने जनतेने पाणी जपून वापरावे आणि ज्या गावात कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यावर फळ्या टाकल्या असतील त्या त्वरित काढून आवर्तनाचे पाणी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे.