बुलढाणा प्रतिनिधी । शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या चारचाकी वाहनावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार आज भल्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडला. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीचे काम सुरू आहे.
गत काही दिवसांपासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या ईनोवा गाडीवर पेट्रोल टाकून त्याचा स्फोट घडवून त्यांच्या एकूणच घरावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. आ. संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते, रात्री दीड वाजता ते घरी परत आले. त्यानंतर 3 वाजेच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर येऊन वाहनाची पेट्रोलची टॅंक जिथे असते, त्याठिकाणी पेट्रोल टाकून ईनोवा गाडी पेटवून दिली. त्याच्या पुढे मागे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या, एक गाडीत पेटली असता ती सर्व वाहने पेटली जातील व घर क्षतिग्रस्त होऊन गायकवाड परिवाराला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे. दरम्यान हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी तोडला होता, असाही कयास व्यक्त होत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी शोध सुरू केला आहे. याप्रकरणी आ. संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, ही घटना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही गंभीरतेने घेतली आहे.