आमदार साहेब…कारणे देऊ नका, पाडळसरे धरण मार्गी लावा !

अमळनेर (ईश्वर महाजन) तालुक्‍यातील महत्त्वाकांक्षी निम्म तापी अर्थात पाडळसरे प्रकल्पाला केंद्र सरकारने निधी दिला नाही म्हणून काम रखडले आहे, असे विद्यमान आमदार शिरीष चौधरी जनतेला सांगत आहेत. शिरीषदादा तुम्ही तर भाजपचे सहयोगी आमदार आहात, तुमचे बंधूही भाजपातच आहेत, तरीही भाजप सरकारकडून तुम्हाला धरणासाठी निधी मिळाला नाही, असे म्हणणे म्हणजे अंग झटकण्यासारखे आहे. अपयशी माणूस नेहमी कारणे देत असतो, तुम्ही कारणं सांगू नका जर तुम्हाला निधी मिळत नसेल तर मग तुम्ही सरकार सोबत का? याचे उत्तर अमळनेरकरांना हवे आहे. आमचा एकच प्रश्न आहे, पाडळसरे धरण कधी पूर्ण होणार?

पाडळसरे प्रकल्पाचा मंत्रालयात व्यवस्थित पाठपुरावा नसल्यामुळेच शासन तुटपुंजा निधी मंजूर करते. त्यात कामे तर सुरूही होत नाही, शिवाय दरवर्षी त्याची किंमत वाढत जातेय. त्यामुळे शासनाच्या काही कोटींच्या निधीची घोषणाही व्यर्थच ठरत आहेत. मुळात पाडळसरे प्रकल्पाला मागील आमदारांच्या काळात केंद्राने नव्हे तर सर्वाधिक पैसा राज्य सरकारने दिला होता.
गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारच्या आड लपून आपण फक्त वेळ मारून नेली आहे. मुळात देशातील अपूर्ण प्रकल्पांना दिलेल्या निधीच्या महाराष्ट्रातील पहिल्या २६ प्रकल्पांमध्ये पाडळसरे प्रकल्प नाहीय. हे माहित असतानाही आपण केंद्र सरकारकडे का बोट दाखवताय ? याचे कारण लोकांना आता कळून चुकले आहे. मुळात आपण पाच वर्षात राज्य सरकारकडून थोडा-थोडा निधी आणला असता तर काम संथ गतीने का असेना सुरूच राहिले असते.

 

निवडणूक लढतांना प्रचारात आपण हा प्रकल्प मार्गी लावण्याचे वचन दिले होते. त्यामुळे अमळनेरकरांना आता कारणे सांगू नका. तुम्ही सत्तेत असून निधी आणू शकले नाहीत, हे तुमचे अपयश आहे. त्यासाठी तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारला दोषी ठरवू शकत नाही. याधीही अमळनेरकरांनी अपक्ष आमदार निवडून दिला होता. त्यावेळी साहेबराव पाटील यांनी तत्कालीन सरकारशी मैत्री करत पाडळसरे प्रकल्पाला करोडोंचा निधी मिळवून आणला होता. बरेचसं काम मार्गी लावले जर साहेबरावदादांना अपक्ष आमदार राहून निधी आणायला जमू शकते तर तुम्हाला का नाही? हे एक मोठंच कोडं जनतेला पडलं आहे.

Add Comment

Protected Content