किन्ही लसीकरण केंद्राला आमदार सावकारे यांची भेट

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम लोकसहभागासह नियोजनामुळे यशस्वी झाली असून ग्रामीण नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या आरोग्य केंद्राला आमदार संजय सावकारे यांनी भेट घेवून वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि युवा पिढी जातीने लसीकरण केंद्रात लक्ष देत असल्यामुळे लसीकरण केंद्रावर नागरीकांची गर्दी दिसून येत नाही. याच पध्दतीने तालुक्यातील कठोरा प्राथमिक केंद्रात देखील नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील बहुतांशी जनतेकडे स्मार्ट फोन नाहीत, त्यातही नेटवर्क योग्य मिळत नाही, वयोवृद्ध नागरिकांना स्मार्टफोन व्यवस्थित चालवता येत नाही, कधी कधी सर्व्हर प्रतिसाद देत नाही, अश्या विविध समस्या गावागावात येत असून नागरिकांनी या सर्व समस्या आमदार संजय सावकारे यांच्याकडे मांडल्या. 

ग्रामीण भागातील या बाबींचा फायदा घेत शहरातील नागरिक आँन लाइन लस बुकिंग करून गावात येतात आणि लस घेतात, यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाला ताटकळत राहावे लागते.कारण टोकन नंबर दिला गेला असतो. यामुळे ग्रामीण जनता लसीकरणापासून वंचित राहते.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना दवंगे, जनसेवक सचिन सोनवणे, उपसरपंच जयंत पाटील, सदस्य दिलिप सुरवाडे , पोलिस पाटील राजेंद्र तायडे , भुसावळ तालुका ग्रामीण सोशल मिडीया प्रमुख  सचिन येवले आदी उपस्थित होते.

लसीकरण ऑफलाईन पध्दतीने करावे- आमदार सावकारे

ग्रामीण भागातील नेटवर्कचा विचार करता ही पध्दत ग्रामीण नागरीकांना अडचणीची ठरत आहे. त्यामुळे जनतेला कुठलाही त्रास न देता सर्वांना ऑफलाईन पध्दतीने लसीकरण करावे यासाठी आपण जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली असून त्याचा पाठपूरावा सुरू आहे अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.

 

Protected Content