जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लोकशाहीच्या उत्सवात राजकीय नेत्यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी असून निवडणूक प्रक्रियेला उत्साही प्रतिसाद मिळत आहे.
जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून त्यांनी मतदान करत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. आमदार भोळे यांच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार सुरेश भोळे यांनी महायुतीबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, राज्यातील २९ महानगरपालिकांवर महायुतीचा झेंडा फडकणार असून नागरिकांनी विकासाच्या मुद्यांवर मतदान केल्यास महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल.
जळगाव महानगरपालिकेबाबत बोलताना आमदार भोळे यांनी महायुतीच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त केला. “जळगाव महापालिकेत महायुतीला किमान ७० जागा मिळतील,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकाभिमुख धोरणांमुळे जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने लागेल, असेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढत असल्याचे समाधान व्यक्त करत त्यांनी नागरिकांना शांततेत आणि निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.



