मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रत्येक विषयावर चवताळून प्रत्युत्तर देणारे एकनाथ खडसे आता सुनेच्या उमेदवारीपासून चिडचूप कसे बसले आहेत ? असा प्रश्न करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. आज शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी खडसे कुटुंबावर कडाडून हल्ला चढविला.
आज शिवसेनेचा मेळावा मुक्ताईनगरात पार पडला. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन, जिल्हा उपाध्यक्ष छोटू भोई,अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अफसर खान, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक जाफर अली, जिल्हा संघटक सुनील पाटील, रावेरचे तालुका प्रमुख यशवंत पाटील ,नवनीत पाटील, नगराध्यक्ष आनंदा पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पंकज राणे,डॉक्टर प्रदीप पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हितेश पाटील, वाय डी पाटील, पंकज पांडव,शिवराज पाटील, आरिफ आझाद,गणेश टोंगे, गाते येथील सरपंच सुनीता कोळी, मंदाताई कोळी, सुनीता कोळी, प्रवीण चौधरी हे प्रमुख उपस्थित होते.
रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र गेल्या दहा वर्षात शिवसेनेची एकही बैठक घेण्यात आली नाही असा रोष व्यक्त करतानाच रावेर लोकसभा मतदारसंघात मतदार संभ्रमात असून उमेदवारी भारतीय जनता पक्षाची आणि जल्लोष मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकार्यांचा अशी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघाला कलाटणी देणारी ही बैठक असून मोदी साहेबांना ४०० पार उमेदवार निवडून द्यायचे आहेत असे सांगताना मतदारांनी जागृत अवस्थेत मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. मात्र याचसोबत त्यांनी खासदार रक्षा खडसे यांनी शिवसेना पदाधिकार्यांना विश्वासात न घेता आपले घर चलो अभियान राबवले आहे त्यावर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले, एकनाथ खडसे यांनी विधानसभेत ब्लॅकमेलिंग करून तीस वर्ष संपत्ती जमवल्याचा आरोप देखील त्यांनी याप्रसंगी केला, प्रत्येक विषयावर चवताळून प्रत्युत्तर देणारे खडसे आता सुनेच्या उमेदवारीपासून चिडचूप बसले असून १३७ कोटीचा दंड कशाप्रकारे माफ करून घेतला हे जनतेला माहित आहे असे सांगत ये पब्लिक हे सब जानती है असा उपरोधिक टोला देखील त्यांनी याप्रसंगी लगावला.
जिल्हा शिवसेनाप्रमुख समाधान महाजन यांनी देखील याप्रसंगी कार्यकर्ते सांगतील तीच दिशा व आमदार ठरवतील ते धोरण असे सांगत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेची आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी विविध कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तीस वर्षात फक्त तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळाल्याची भावना व्यक्त केली दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत केल्यानंतरही खासदार रक्षा खडसे यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सहकार्य किंवा शिवसेनेला महत्व दिले गेले नाही असा सूर बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आला. सुनील पाटील व अफसर खान यांनी ज्याप्रमाणे एकनाथराव खडसे राष्ट्रवादीचे काम करणार त्याचप्रमाणे आम्हीही युतीचे काम करणार असा उपरोधिक टोला देखील लगावला जिल्हा उपप्रमुख छोटू भोई यांनी गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सहकार्य न मिळता उलट खडसे परिवाराकडून खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील सांगतील तेच आमचे धोरण असेल असेही त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका आघाडी महिला आघाडी तसेच युवा सेनेच्या वतीने प्रयत्न करण्यात आले.