मुक्ताई साखर कारखान्याला गैर प्रकारे कर्ज वाटप- चंद्रकांत पाटील ( व्हिडीओ )

chandrakant patil1

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताई शुगर या खासगी साखर कारखान्याला गैर प्रकारे कर्ज देण्यात येत असून आपण याला विरोध करणार असल्याची माहिती आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. या माध्यमातून त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरूध्द दंड थोपटल्याचे दिसून येत आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराबद्दल आरोपांच्या फैरी झाडल्या. मुक्ताई शुगर या खासगी कारखान्याला ३९ करोड रूपयांमध्ये खरेदी केली असतांना जिल्हा बँकेने कारखान्याला तब्बल ५१ कोटी रूपयांचे कर्ज दिले. यानंतर दिलेल्या कर्जाचा विचार केला असता हा आकडा १२५ कोटी रूपयांचा होत असून यात मोठा घोळ असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि इतरांची भेट घेऊन तक्रार करू. तसेच या प्रकरणी न्यायालयात दाद मागू अशी माहितीदेखील आमदार पाटील यांनी दिली.

जिल्हा बँकेची स्थिती आधीच नाजूक असतांना खासगी साखर कारखान्याला कर्ज कशासाठी असा प्रश्‍न आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित केला. ते म्हणाले की, मधुकर सहकारी साखर कारखाना अडचणीत असतांना त्या सहकारी तत्वावरील कारखान्याला कर्ज न देता, जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या खासगी कारखान्याला कर्ज देण्याचा प्रकार संशयास्पद असून आपण या विरोधात वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा सुध्दा आमदार पाटील यांनी याप्रसंगी दिली. या माध्यमातून त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरूध्द दंड थोपटल्याचे दिसून येत आहे.

पहा : आमदार चंद्रकांत पाटील यांनी नेमके कोणते आरोप केलेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/542432913010180

Protected Content