अमळनेर प्रतिनिधी । बालपणातच अतिशय दुर्देवी वेळ अमळनेरच्या जानवी व कल्पेशवर आली असताना अमळनेरचे विद्यमान आ.अनिल पाटील व जि.प. सदस्या जयश्री पाटील यांनी दोघा भावंडांना मातृ-पितृ छत्राचा आधार देत कायमस्वरूपीचे पालकत्व स्वीकारल्याने दोन्ही बहीण भावंडे आज शिक्षित व सज्ञान झाले. यातील जानवीचा विवाह आदर्श पद्धतीने शासकीय नियमांचे पालन करीत 2 डिसेंबर रोजी घटिक मुहूर्तावर शिरपूर तालुक्यातील नागेश्वर महादेव मंदिरावर विधीवत पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे जानवी ही रंगरूपाने सुंदर व सुशील असल्याने सौ जयश्री पाटील व आ अनिल पाटील यांनी आपल्या या लाडक्या कन्येसाठी आपल्याच नात्यागोत्यातील शिरपूर तालुक्यातील विखरण येथील अतिशय चांगले स्थळ शोधले, मुलगा चि.राहुल देखील शिक्षित व पुणे येथे स्वतःचा आर ओ वॉटर फिल्टर चा व्यवसाय करून उत्तम कमावता व दिसायला ही जानवी प्रमाणेच सुंदर असल्याने हे स्थळ साऱ्यांनाच पसंत पडले, खरेतर आपल्या कन्येचा विवाह अतिशय थाटामाटात लावण्याचीच आमदार पाटील यांची आधीपासून इच्छा होती परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने नियमांचे पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच विवाह सोहळे आयोजित करण्याची परवानगी दिली असल्याने आमदारांनी याचे पालन करून पवित्र असे नागेश्वर देवस्थान निश्चित केले, दरम्यान विवाहाच्या पूर्वसंध्येला आमदारांच्या निवासस्थानी छोटेखानी संगीत सोहळा देखील पार पडला, मैत्रिणींनी जानवी सोबत नाच गाण्याचा मनसोक्त आनंद घेतला, तर दुसऱ्या दिवशी नागेश्वर येथे दोन्ही कडील फक्त 100 लोक बोलावून आदर्श पद्धतीने मात्र सर्व विधी पूर्ण करीत आणि काहीसा थाटात हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला,आ अनिल पाटील व सौ जयश्री पाटील यांनी स्वतः लाडक्या कन्येचे कन्यादान केल्यानंतर आनंदाश्रू ढाळत तिला निरोप दिला, विशेष म्हणजे आमदारांच्या संपूर्ण भाऊ बंदकीने व नातलगांनी देखील सहकार्यासाठी पुढाकार घेतला, त्यात कुणी साखरपुडा तर कुणी हळदीची जवाबदारी घेतली, सुनील शालीग्राम पाटील यांनी वरपूजा केली, वधू ची बहीण म्हणून चेतना योगेश पाटील (मुडी) व कविता पाटील यांनी वराचे औक्षण केले, कृष्णा पंडित पाटील हे मुलीचे मामा झालेत, याव्यतिरिक्त विजय प्रभाकर पाटील, प्रविण पाटील व सौ मालतीबाई शिवाजी पाटील या साऱ्यांनी विविध भूमिका पार पाडल्या, या विवाह सोहळ्यास शिरपूर पालिकेचे नगराध्यक्ष भुपेश भाई पटेल, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, मार्केट चे संचालक विजय प्रभाकर पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, डॉ रामराव पाटील, भागवत पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, अनिल पाटील, शेतकी संघाचे माजी संचालक पिंटू राजपूत, पं.स सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती जाधव, विनोद पाटील, देविदास देसले, हिंमत पाटील, एस टी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष एल टी पाटील, सुनिल पाटील सह पत्रकार बांधव, नातलग मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिपूर्ण पालकत्व स्वीकारून घरातच दिला आसरा- जानवी आणि कल्पेशच्या आईचे अमळनेर हे माहेर, शहरातील बोरसे गल्लीत त्यांचा रहिवास होता,त्यांच्या आईचा विवाह होऊन अहमदाबाद येथे तिला दिले असताना कल्पेश व जानवीचा जन्म झाला मात्र कौटुंबिक कलहामुळे त्यांची आई पतीला सोडून अमळनेर येथे मुलांसह माहेरी आली,इकडे आजी एकटीच असताना तिनेही दोन्ही चिमुकल्या नातवांसह मुलीला आसरा दिला,घरात दारिद्र्य असताना मेहनतीने ते रहाटगाडा चालवीत होते, जानवी आणि कल्पेश ची आजी आमदार अनिल पाटील यांच्याकडेच सुरवातीपासून घरकामाला होती, दुर्दैवाने काही दिवसात आजारामुळे या चिमुकल्यांच्या आजीचा मृत्यू झाल्याने सारी जवाबदारी त्यांच्या आईवर आली,आईने कसेबसे काही दिवस मुलांना सांभाळले, मात्र आजारामुळे व परिस्थिती पुढे ती देखील हरून तिनेही जगाचा निरोप घेतला आणि तेथूनच जानवी व कल्पेश चा जगण्याचा खरा प्रश्न निर्माण झाला,कारण जबाबदारी घेणारे कुणीही नसल्याने महिनाभर त्यांनी आजूबाजूला मागून खाल्ले,ही बाब पाहून शेजारील महिलांचे मातृत्व जागृत झाल्याने त्यांनी दोन्ही लेकरांना घेऊन आ अनिल पाटील यांच्याकडे धाव घेतली, त्यावेळी सौ जयश्री पाटील या अमळनेर नगरीच्या नगराध्यक्षा होत्या, दोन्ही लेकरांची परिस्थिती पाहून दोन्ही अनिल पाटील व सौ जयश्री पाटील या पती व पत्नींना पाझर फुटून त्यांनी मानस कन्या व पुत्र म्हणून दोंघांचाही मोठया मनाने स्वीकार केला, एवढेच नव्हेतर आपल्या घरातच त्यांना आसरा देऊन त्यांचे पालनपोषण आणि शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली. दोघांना आपल्या मुलांप्रमाणेच सर्व सुविधा देऊ केल्या, विशेष म्हणजे नव्या बंगल्यात देखील दोघांसाठी स्वतंत्र रूम देण्यात आली, मुलगी म्हणून जानवीला येणाऱ्या सर्व अडचणी जयश्रीताईंनी काळजीपूर्वक हाताळल्या, बघता बघता दोन्ही बहीण भावंडे शिकून सवरून मोठे होऊन सज्ञान झाले, जानवी आता बी ए चे शिक्षण घेत असून मुलगा कल्पेश 12 वी नंतर आयटीआय झाल्याने त्याला मुंबईत बेस्ट कंपनीत बसेस ऑपरेटर म्हणून आ पाटील यांनीच नोकरी मिळवून दिली असून त्याच्या रहिवासाची सोय देखील त्यांनीच करून दिली आहे, मुलगी सज्ञान झाल्याने व स्थळ देखील पाहण्यातील च चांगले मिळाल्याने जानवी ला विवाहबद्ध करण्याचा निर्णय आ. पाटील व जयश्री ताईंनी घेतला. वराकडील मंडळींचे देखील आमदारांनी केले कौतुक
विवाह सोहळ्यात आमदारांनी आशिर्वादपर मनोगत व्यक्त करताना वरराजा राहुल पाटील व त्याचे पिता सुरेश पाटील (रा विखरण ता शिरपूर ) यांनी अतिशय मोठे मन करून कोणतीही अपेक्षा न करता कन्या जानवीचा स्वीकार केल्याबद्दल समाजासाठी हे कुटुंब आदर्श असल्याचे सांगत विशेष आभार व्यक्त केले व यापुढेही जानवी चे आई वडील, मामा, मावशी व जावई राहुल यांचे सासू सासरे, सारे काही आम्हीच राहू आणि तुमच्या प्रेमळ अपेक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करू असे सांगायला देखील आमदार विसरले नाहीत. मात्र ज्याप्रमाणे आम्ही जानवी चा सांभाळ करून प्रेम दिले तसेच प्रेम आपण देखील द्यावे अशी विनंती त्यांनी वराकडील मंडळींना केली. याशिवाय जानवी ला तर आम्ही स्वीकारलं तीला शिकविल,तीच पालनपोषण केलं इथपर्यंत ठीक आहे, परंतु विवाह सोहळ्यात साऱ्या परंपरा जोपासताना कोणत्या अडचणी येतात हे मी आज जानवी चा बाप म्हणून अनुभवले, परंतु माझी भाऊबंदकी व नातलगांनी मोठे सहकार्य यासाठी केले, यात कुणी मामा कुणी बहीण, कुणी मावशी तर कुणी काका बनून विविध भूमिका केल्या, त्यामुळे, हळद, साखरपुडा, तेलन यात कोणतीही अडचण भासली नाही, यामुळे साऱ्यांचेच आम्ही ऋणी आहोत, समाजात असे कुणी मातृपितृ छायेपासून वंचित असतील तर त्यांना समाजातील सक्षम घटकांनी असाच आधार देऊन पालकत्व स्वीकारावे असे आवाहन आमदारांनी साऱ्या उपस्थितांना केले.
दादा- आईच्या प्रेमापुढे आई वडील विसरलो- वडिलांसमान आमचे दादा व आईसमान ताईंनी आम्हाला जे मनस्वी प्रेम व संस्कार दिलेत त्यामुळे आम्ही आमचे सख्खे आई वडील विसरलो असून परमेश्वर पुढील जन्मी आम्हाला त्यांच्या पोटी जन्माला घालेल एवढीच प्रार्थना आहे, कदाचित आमच्या आईकडून एवढे झाले नसते एवढे दोघांनीही आमच्यासाठी, अन्यथा आज आम्ही कुठ असतो याचा विचार देखील करू शकत नाही, आमचे नाना नानी, राजश्री ताईं, घरातील माधवी ताई, गौतम दादा, वासु दादा, रश्मी ताई या सर्व बहीण भावंडांनी प्रचंड जिव्हाळा आम्हाला दिला, खरोखरच नशिबाने अतिषय आदर्श कुटुंब आम्हाला लाभल्याने आम्ही दुर्देवी नाहीत नाहीत तर स्वतःला नशीबवान समजतो अशी भावना जानवी व कल्पेश यांनी विवाह सोहळ्यानंतर व्यक्त केली.