जळगाव प्रतिनिधी । एन.एस.एस.चे विशेष हिवाळी शिबिर आपल्या आयुष्याला नवे वळण देते. प्रत्येकामध्ये सामाजिक भावना, सामुहिक संवेदना आणि मानवता रुजविण्याचे काम विशेष हिवाळी शिबिर करते असे मत मू. जे. महाविद्यालयातील भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसूर यांनी केले. कडगाव येथे आयोजित केलेल्या मू. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्याला समाजसेवा आणि स्वयंशिस्तीचे धडे देते विशेष हिवाळी शिबिरात जी सामाजिक कामे आपण करतो त्यामुळे आपण स्वावलंबी होतो असेही मत त्यांनी व्यक्त केले. दि. २२ ते २८ डिसेंबर २०१९ दरम्यान कडगाव येथे आयोजित केलेल्या विशेष हिवाळी शिबिराच्या समारोपप्रसंगी रा.से.यो. जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. विजय मांटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. एनएसएस ही सामाजिक हितासाठी व्यापक स्तरावर काम करणारी मोठी चळवळ आहे. या चळवळीत काम करणारा स्वयंसेवक विशेष हिवाळी शिबिराच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणतो. आपल्यात विचार करण्याची क्षमता आणि सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची जाणीव यामुळे निर्माण होते असे मत डॉ. विजय मांटे यांनी व्यक्त केले.
कडगाव येथील जीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. एस.पी. चौधरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आमच्या शालेय विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकता आल्या. आमच्या गावात या शिबिराच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे झाली. आम्हाला प्रबोधनपर पथनाट्ये पाहता आली. असे मत त्यांनी व्यक्त केले. या हिवाळी शिबिरात सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रशांत महाजन आणि शीतल चौधरी यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट गट म्हणून गट क्र. ४ राष्ट्रसेवा या गटातील स्वयंसेवकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
शिबिराचा आढावा कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश महाले यांनी घेतला. यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. आर. वसावे, आदिती पाटील, प्रा. गोपीचंद धनगर आणि स्वयंसेवक उपस्थित होते. या शिबिरात एक भारत श्रेष्ठ भारत, संविधान दिन ते राष्ट्रीय समरसता दिन यावर प्रबोधन केले जाणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, ग्रामीण विकास, ग्राम वाचनालय असे उपक्रम राबविले गेले. या शिबिरात मनोज गोविंदवार यांचे ‘युवाशक्ती’, देवयानी गोविंदवार यांचे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, अद्वैत दंडवते यांचे ‘शिक्षण हक्क’, डॉ. सुजाता महाजन यांचे ‘आरोग्य’, डॉ. रागिणी पाटील यांचे ‘अवयवदान:श्रेष्ठदान’, संतोष खिराडे यांचे ‘आपत्ती व्यवस्थापन’ गणेश सोनार यांचे ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली.
कडगावातील बसस्थानक चौकात आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन, एड्स निर्मूलन, स्वच्छता, जल है तो कल है या सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक पथनाट्ये सादर केली. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, पाण्याची टाकी परिसर, शनी मंदिर, जिल्हा परिषद शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या शिबिरात विविध विषयांवर गटचर्चा घडवून आणली. गावात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.