जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रतापनगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या काही सभासदांनी बेकायदेशीरपणे त्र्यंबकेश्वराच्या गुरुपीठाच्या आदेशाने लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. एका स्वतंत्र संस्थेच्या मालकीचे पैसे बेकायदेशीरपणे घेऊन जाणे, त्याचा कुठलाही हिशेब न दाखविणे हा केंद्रावर गुरुपीठाने टाकलेला दरोडाच आहे. याबाबत धर्मदाय आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनही सहकार्य मिळत नाही, असा गंभीर आरोप श्री स्वामी समर्थच्या सेवेकऱ्यांनी बुधवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी पत्रकार परिषदेत केला आहे.
नितीन चव्हाण, रविंद्र कदम, पंकज पाटील, प्रवीण चौधरी, संदीप व्यास, दिनकर देशमुख, बाळू पाटील आदी सेवेकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली आहे. जळगाव शहरातील प्रतापनगर येथील केंद्राच्या ट्रस्टचे सदस्य भरतसिंग मोहनसिंग पाटील राजपूत हे स्वयंघोषित अध्यक्ष तर रमेश बाबुराव परदेशी हे स्वयंघोषित उपाध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करीत आहेत. या केंद्रातील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या गैरव्यवहाराविषयी धर्मदाय आयुक्तांकडे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रार देण्यात आली होती. मात्र या तक्रारीबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ४ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना रीतसर लेखी तक्रार देण्यात आली. मात्र त्यांनी उलट तक्रारी प्रश्नांचा भडीमार करून सकारात्मकता दर्शविली नाही. असाच अनुभव पोलीस अधीक्षक कार्यालयातदेखील आला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांचेदेखील या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही लक्ष वेधून घेऊ इच्छित आहे.
धार्मिक बाबांच्या दरबारात अनेक राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील तसेच सरकारी अधिकारी हजेरी लावत असतात. त्याचमुळे पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आला असावा अशी मनात शंका येत असून त्याचमुळे पोलीस असहकार्य करीत आहेत का, असाही आरोप केंद्राच्या सभासदांनी केला आहे. दिंडोरी प्रणित श्री गुरुपीठ संस्था, त्र्यंबकेश्वरने प्रतापनगर केंद्राकडून आर्थिक स्वार्थाने हेतुपुरस्कर संगनमत केले आहे. प्रतापनगर केंद्रातील स्वयंघोषित लोकांनी दरवर्षी काही रक्कम गुरुपीठाला बेकायदेशीररीत्या दिलेली आहे.
दर हप्त्याला त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ संस्थेचे वाहन येते व दानपेटीतील पैसे एका थैलीत बेकायदेशीरपणे भरून घेऊन जातात. दानपेटीत किती पैसे होते, याचा हिशेब कुठल्याही सेवेकऱ्याला मिळत नाही. एका स्वतंत्र संस्थेच्या मालकीचा पैसा बेकायदेशीरपणे घेऊन जाणे हा शुद्ध केंद्रावर टाकलेला दरोडाच आहे. याशिवाय क्युआर कोड, पावती पुस्तकाद्वारेदेखील गुरुपीठाच्या सेवेकऱ्यांनी अवैधपणे पैसे स्वीकारले आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत नितीन चव्हाण, रविंद्र कदम, पंकज पाटील आदींनी केला आहे.