धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चावलखेडा गावाजवळील रेल्वे बोगद्याजवळून अवैधपणे मुरूमची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांना धमकी देवून चालक वाहन घेवून पसार झाल्याची घटना मंगळवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील रेल्वे बोगदा परिसरातून विना परवाना मुरूमची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी महसूल पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारवाई केली. त्यावेळी डंपरचालकावकडे वाहतूकीबाबतचा परवाना विचारला असतांना त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने डंपर हे तहसील कार्यालयात नेण्याचे सांगितले. दरम्यान, चालकाने त्यांच्या मालकाने सांगितल्यावरून डंपर घेवून पसार झाला. याबाबत रात्री ९ वाजता धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश रघुनाथ पाटील रा. मुसळी ता. धरणगाव, गोपाल चौधरी, सचिन चौधरी आणि चंदू यावद तिघे राहणार पिंप्री ता. धरणगाव या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.




