चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाली. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. अखेर या प्रकरणी मुलीचे वडील यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पीडित मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेले आहे. या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहेत.



