Home Uncategorized मंत्री नरहरी झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडे कार्यमुक्त

मंत्री नरहरी झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडे कार्यमुक्त


मुंबई-वृत्तसेवा । राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणानंतर मोठी प्रशासकीय कारवाई करत खासगी सचिव रामदास गाडे यांना तातडीने पदावरून कार्यमुक्त केले आहे. तसेच त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

अन्न व औषध प्रशासन खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५० हजार रुपयांच्या मागणीपैकी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंत्रालयातच रंगेहाथ पकडले होते. सध्या ढेरिंगे पोलिस कोठडीत असून चौकशीत त्याने मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचे नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयातच हा प्रकार घडल्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री झिरवाळ यांनी तातडीने निर्णय घेत रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त केले. गाडे हे झिरवाळ यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. आता त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात – कृषी व पदुम विभागात वर्ग करण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला आवश्यक आदेश काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लाचखोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी मंत्री झिरवाळ यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळल्यास आपण स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे स्पष्ट केले होते.

दरम्यान, या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्री झिरवाळ यांच्या खात्याच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. प्रशासन व पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच अधिकाऱ्यांमुळे सरकारची बदनामी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

मंत्रालयातील लाचखोरीचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे. व्हिडिओ शूट करणाऱ्या निर्मल शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना धक्कादायक आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, विभागात येणाऱ्या फाईल्सवर लाल व हिरव्या पट्ट्यांद्वारे किती पैसे घ्यायचे याचे संकेत दिले जात होते. तसेच काही प्रकरणांमध्ये सुनावण्या अधिकाऱ्यांकडून घेतल्या जात असून कामासाठी पैसे देणे अनिवार्य असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकरणावर बोलताना मंत्री झिरवाळ यांनी म्हटले होते की, “माझ्या विभागातील कर्मचारी लाच घेताना सापडला, ही माझीही जबाबदारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. चौकशीत माझ्यापर्यंत धागेदोरे आढळल्यास मी १०० टक्के मंत्रिपदाचा राजीनामा देईन.”

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून यात आणखी कोणाचे नाव समोर येते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंत्री झिरवाळ यांनी केलेल्या कारवाईनंतर प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील काळात आणखी कठोर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound