अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे फेब्रुवारी महिन्यात 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संमेलनाची संपूर्ण जबाबदारी घेत कोणत्याही परिस्थितीत 26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा आणि कामाच्या तयारी बाबत आठ आठ दिवसात रिपोर्टिंग करा अशा सूचना शासकिय आढावा बैठकीत सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती,यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार श्री सुराणा,पोलीस निरीक्षक विजय शिंदे,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील,न प चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सदर बैठकीत प्रामुख्याने रस्ते,सुविधा,स्वच्छता,शहर सुशोभीकरण,शहरातील अवैध धंदे याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की 72 वर्षानंतर अमळनेरला हे साहित्य संमेलन होत असल्याने याचे नियोजन आपल्या सगळ्यांना काळजीने करायचे असून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले झाले पाहिजे,यासाठी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन करा,कोणतीही उणीव राहू देऊ नका काहीही अडचण असल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधा अश्या सूचना त्यांनी अधिकारी वर्गास केल्या.तसेच साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून 2 कोटी,जिल्ह्यातील सर्व आमदारांकडून 1 कोटी,खासदारांकडुन 5 लक्ष,रस्त्यासाठी नगरोथान मधून 1 कोटी 20 लक्ष,आणि अन्य 40 लक्ष असा एकूण साडेपाच कोटी निधी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध झाला असून हा संपूर्ण निधी संमेलनासाठी विविध सुविधांवर खर्च होणार आहे तर दीड कोटी निधी लोकसहभागातून उपलब्ध करण्याचा प्रयत्न मराठी वाङमय मंडळ आणि समितीचे सदस्य करीत असल्याचे मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.
या विषयासंदर्भात मंत्री पाटील यांनी अधिक गंभीर होत पोलीस प्रशासनास सक्त सूचना केल्या,ते म्हणाले की या अमळनेर पुण्यभूमीत अवैध धंद्याना सक्त विरोध असून मराठी साहित्य संमेलनासारखे मोठे कार्य या भूमीत होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत शहरात सुरू असलेला अवैध मटका,सट्टा, जुगार,अवैध दारू,तरुण तरुणींना प्रायव्हसी देणारे कॅफे हे सर्व प्रकार तात्काळ थांबवा,शहरात कोणत्याही ठिकाणी मटका सट्टा नजरेत पडता कामा नये याबाबत कोणतीही सबब एकुण घेतली जाणार नाही अश्या सक्त सूचना मंत्री पाटील यांनी देत केलेल्या कारवाईचे तात्काळ रिपोर्टिंग देखील करा अश्या सूचना देखील केल्या.
मंत्री अनिल पाटील यांनी इतर विषयांकडे देखील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत नगरपरिषदेने पाणीपट्टीवर व्याज आकारणी कोणत्याही परिस्थितीत बंद करावी अशा सूचना करीत याबाबत तात्काळ कारवाई करावी तसेच शहरातील नागरिकांच्या मालमत्तांची नव्याने मोजणी होत असल्याने यात नागरिकांची लूट होणार असेल तर हा प्रकारही तात्काळ थांबवा अशा सूचना मंत्री पाटील यांनी केल्या असत्या असा कोणताही प्रयत्न पालिकेचा नसून केवळ ज्यांनी घराचे बांधकाम करून पाच पाच वर्षे घराची परवानगी किंवा कंपलिशन घेतले नसेल त्यांनाच यातून कराची आकारणी होणार असून नागरिकांनी याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये आणि अफवाना बळी पडू नये असा खुलासा पालिकेच्या मुख्याधिकारीनी केला.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा सर्कलचे शेतकऱ्यांना कापूस विमाची अग्रीम रक्कम कृषी विभागाच्या तांत्रिक अडचणी मुळे मिळाली नसल्याने जिल्हाधिकारी यांनी स्वतः याप्रकरणी लक्ष घालून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि शेतकरी बांधवाना तात्काळ रक्कम मिळवून द्यावी अश्या सूचना मंत्री श्री पाटील यांनी केल्या.