जळगाव प्रतिनिधी । एमआयएमचे महानगराध्यक्ष रैयान जहागिरदार यांच्यासह सहा जणांना रात्री मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरात काल सकाळीच किरकोळ विक्रेत्यांमध्ये गाडी लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यानंतर रात्री सव्वानऊच्या सुमारास रजा कॉलनीतील रहिवासी खालीद शेख शब्बीर हे स्मशानभूमिजवळ पादत्राणे विकत असतांना त्यांना तीन तरूणांची फुकटात बुट मागितले. याला नकार दिल्यानंतर त्यांना अचानक मारहाण करण्यात आली. यानंतर नेरी नाक्यावरील चिकू विक्रेते आबीद बिस्मील्ला बागवान व रमीज खान यांच्यावरही हल्ला करण्यात आला. इतक्यात तेथून जात असणारे एमआयएम पक्षाचे महानगराध्यक्ष रैयान जहागीरदार यांच्यावरही या तरूणांनी हल्ला चढविला. यासोबत रिझवान बागवान आणि एमआयएमचे तालुकाध्यक्ष जिया बागवान यांनाही मारहाण करण्यात आली. यात हे सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या हल्ल्याचा सकाळच्या हल्ल्याशी काही संबंध आहे का ? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.