एमआयएमची पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर

खासदार असदुद्दीन ओवेसी

 

औरंगाबाद वृत्तसंस्था । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी ट्विटरव्दारे जाहीर केली. यामुळे वंचित बहुजन आघाडीशी संभाव्य युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘एमआयएम’शी अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू राहील, असे ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यामुळे एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, उमेदवार जाहीर करून एमआयएमने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पैकी भायखळ्याची जागा सध्या एमआयएमकडे आहे. वारीस पठाण हे येथील आमदार आहेत. एमआयएमच्या पहिल्या यादीत रत्नाकर डावरे (कुर्ला), सलीम कुरेशी (वांद्रे पूर्व), वारीस पठाण (भायखळा), सरफराज शेख (अणुशक्तीनगर) आणि आरिफ शेख (अंधेरी पश्चिम) यांचे नावे आहेत.

Protected Content