मुंबई प्रतिनिधी । दूधाला भाववाढ मिळावी या मागणीसाठी राज्याच्या विविध भागांमध्ये आज पहाटेपासून आंदोलनांना प्रारंभ करण्यात आला आहे. ठिकठिकाणी टँकर अडवून राज्य शासनाचा निषेध केला जात आहे.
शेतकरी संघर्ष समितीने राज्य सरकारकडे दूधाला वाढीव भाव मिळावा ही मागणी केली होती. मात्र याला मान्य करण्यात न आल्यामुळे आधी सूचना दिल्यानुसार आज पहाटे चार वाजेपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. यात भाजप व मित्रपक्षांची महायुतीदेखील सहभागी झाली आहे. किसान सभा, शेतकरी संघर्ष समिती व अन्य संघटनांनी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. यात प्रामुख्याने दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करा. २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकर्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करावा. जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा. देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्यावे. आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. २० जुलैपासून सुरू झालेले हे आंदोलन आजपासून तीव्र करण्यात येत आहे.
दरम्यान, आज पहाटे चार वाजेपासून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले असून, महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक करून तसेच ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक घालून शेतकर्यांनी सरकारचा निषेध केला आहे.