जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामधून दूध पावडर ट्रकमध्ये भरून परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. परंतु या दूध पावडरची रक्कम दुध संघाला मिळाली असून झालेल्या अपहरात जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा कुठलाही संबंध नसल्याचे जळगाव जिल्हा सहकार्य दूध उत्पादक संघ एका प्रसिद्धी पत्रकानुसार खुलासा केला आहे.
दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी नगरातील जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातून राजस्थान येथील जोधपूर येथील विरल मिल्क अँड ऍग्रो इंडस्ट्रीज यांना ५ जून रोजी म्हैस दूध भुकटी संघामार्फत विक्री करण्यात आलेली आहे. त्या मालापोटी संघाला रक्कम देखील मिळालेली आहे. हा माल संघाने विरल मिल्क अँड ऍग्रो इंडस्ट्रीज जोधपुर राजस्थान यांना विक्री केला असून संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्या स्वाधीन केलेला आहे. त्यामुळे त्या मालाची संपूर्ण जबाबदारी ही विरल मिल्क अँड ऍग्रो इंडस्ट्रीज या कंपनीची आहे. त्यामुळे झालेला अपहर किंवा गैरव्यवहार याच्याशी जळगाव दूध संघाचा कुठलाही संबंध नाही. संघाने सदरील माल विक्री केलेला असून संघास सदर मालापोटी संपूर्ण रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे संघाचे कोणतेही नुकसान झालेले नाही ,असे देखील दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.