Home amalner मध्यरात्री थरार: पांझरा नदीपात्रात वाळूमाफियांनी मंडळाधिकाऱ्याच्या कपाळाला लावले गावठी पिस्तूल !

मध्यरात्री थरार: पांझरा नदीपात्रात वाळूमाफियांनी मंडळाधिकाऱ्याच्या कपाळाला लावले गावठी पिस्तूल !


अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मांडळ शिवारातील पांझरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी रविवारी ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री सरकारी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर जीवघेणाहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळूमाफियांनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर स्प्रे मारून त्यांना जखमी केले, तर एका कर्मचाऱ्याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांडळ शिवारात पांझरा नदीपात्रात रविवारी ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वावडे येथील मंडळाधिकारी पुरुषोत्तम शिवाजी पाटील (वय ३६) आणि त्यांचे सहकारी जितेंद्र दिलीप पाटील हे गस्त घालत नदीपात्रात पोहोचले. यावेळी नदीत दोन ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या साहाय्याने वाळू भरण्याचे काम सुरू होते.

मंडळाधिकारी पाटील यांनी ट्रॅक्टर आणि जेसीबी चालकांना वाळू वाहतुकीबद्दल विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पाटील यांनी वाहने अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. याचवेळी तोंडावर मफलर आणि रुमाल बांधलेले १० ते १२ अनोळखी व्यक्ती लाठ्या-काठ्या घेऊन त्याठिकाणी आले.

स्प्रे मारून डोळे जखमी केले, गावठी पिस्तूल कपाळाला लावले वाळूमाफियांनी जितेंद्र पाटील यांना शिवीगाळ करत, ट्रॅक्टर आणि जेसीबी सोडून देण्याची धमकी दिली. वाळूमाफियांनी जितेंद्र पाटील यांच्या तोंडावर आणि डोळ्यांवर हातातील स्प्रे मारला, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली. यानंतर जमावातील एका व्यक्तीने गावठी पिस्तूल काढून मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या कपाळाला लावत “तुम्ही येथून निघाला नाही तर तुम्हाला जीवे ठार मारेल आणि यापुढे तुम्ही नदीपात्रात आलात तर जिवंत सोडणार नाही,” अशी गंभीर धमकी दिली.

या हल्ल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर, जेसीबी आणि दुचाकीवर आलेले सर्व वाळूमाफिया वाहने घेऊन पसार झाले. या घटनेमुळे भयभीत झालेल्या मंडळाधिकारी पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी वाळूमाफियांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound