रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील तामसवाडीनजिक असलेल्या दत्ता अॅग्रो या खताच्या कंपनीत अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्री दरोडा टाकून चोरटयांनी ३६ हजार रुपये रोख व नट बोल्ट आणि बैअरिंग मिळून एकूण दोन लाख ७९ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सात ते आठ दरोडेखोर भोकर ते तामसवाडी रोडवर गावालगत असलेल्या दत्ता अॅग्रो या खताच्या कंपनीच्या गेटवरुन उड्या मारून कंपनीच्या आवारात शिरले. कंपनीचे कर्मचारी दत्तात्रय चौधरी, सोपान महाले व प्रमोद पाटील या तिघांना त्यांनी मारहाण केली व बांधून ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने स्टोअरच्या चाव्या घेतल्या व स्टोअरमधुन दोन लाख ४४ हजार रूपयांचे बेअरींग बुश आणि बोल्ट तसेच कंपनीच्या ऑफिसमधील रोख ३६ हजार रुपये लंपास करून फरार झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते, मात्र श्वानाने फक्त गेटपर्यंतच माग दाखवला. अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुरक्षा रक्षक दत्तात्रय चौधरी यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिस स्थानकात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून दरोडे खोरांच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत.