नवी दिल्ली वृत्तसंस्था । येत्या २७ सप्टेंबरपासून श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, काही श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यामुळे जावेद मियाँदाद भडकला आहे. त्याने या खेळाडूंवर टीकेची झोड उडवत दंड वसूल करण्याच्या सल्ला श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला दिला आहे.
श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान तीन वनडे आणि तीन टी-२० सामने होणार आहेत. या दौऱ्यावर जाण्यास श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, दिमुथ करुणारत्ने, निरोशान डिक्वेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्व्हा, थिसारा परेरा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास खेळाडूंनी प्राधान्य देण्याचे सोडून खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. म्हणून या खेळाडूंकडून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दंड वसूल करावा, असा सल्ला माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याने दिला आहे. यावेळी मियाँदादनं पाकिस्तानी खेळाडूंनाही मोलाचा सल्ला दिला. खेळाडूंनी आगामी मालिकेवर लक्ष केंद्रीत करावे. या मालिकेसाठी जोरदार तयारी करावी. श्रीलंकेचा कोणता खेळाडू दौऱ्यावर आला नाही. याचा विचार न करता खेळाडूंनी चांगला खेळ खेळण्यावर भर द्यावा, असे ही तो म्हणाला आहे.