पारोळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम साजरा करता येत नसल्याने पारोळा येथे दहावी तालुकास्तरीय बक्षिस समारंभाची २७ वर्षांची परंपरा खंडित होऊ न देता प्रातिनिधिक स्वरूपात सर्वाधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवपत्र देवून सत्कार करण्यात आला.

शहरातील येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी मार्च २०२० परीक्षेत प्रत्येक माध्यमिक शाळेत प्रथम आलेल्या ४९ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक गुण मिळवलेले सर्वेश रुपेश बाहेती तेजस्विनी राजेश पाटील, अनुजा योगेश कोठावदे, वैष्णवी भिकनराव पाटील व अपूर्वा प्रदीप भावसार या पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बक्षीस म्हणून १००/- रुपये रोख व गौरव पत्र येथील माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष स्थानी साप्ताहिक पारोळा भूषणचे संपादक व जिल्हाध्यक्ष ( ग्रामिण ) ज. जि. पत्रकार संघ भिका तुकडू चौधरी होते.

तालुक्यातील उर्वरित ४४ विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी सवडीनुसार १५ दिवसात केव्हांही घरी येऊन आपलं बक्षीस व गौरवपत्र न्यावे अशी नम्र सूचना आयोजक भावसार यांनी भ्रमणध्वनी द्वारा संपर्क साधून केली आहे. याच प्रसंगी गुणी जनसत्कार म्हणून पारोळा निवासी व माजी विद्यार्थी धुळे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो ) गोविंदा पांडुरंग दाणेज यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल स.ध. भावसार यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून भावपूर्ण सत्कार केला.

प्रमुख पाहुणे गोविंद शिरोळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष भिका चौधरी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गोविंदा दाणेज यांनी आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. तेजस्विनी पाटील, अपूर्वा भावसार व पालक भिकनराव पाटील यांनी देखील आयोजकाविषयी आदरभाव व्यक्त केला व आभारही मानले.

Protected Content