Home Cities अमळनेर गुरांची निर्दयीपणे वाहतूक : चार गुरांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल

गुरांची निर्दयीपणे वाहतूक : चार गुरांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील सुभाष चौक आणि तेली भवन परिसरात विनापरवाना गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ गुरांची सुटका केली असून दोन मालवाहू गाड्यांसह एकूण ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील सुभाष चौक ते तेली भवन दरम्यान संशयास्पद वाहने जात असल्याची माहिती पोलिसांना ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल विलास गजानन बागुल व त्यांच्या पथकाने सापळा रचून टाटा कंपनीची गाडी (क्र. एमएच १८ एए ४२६१) आणि महिंद्रा सुप्रो (क्र. जीजे २६ टी ७४४६) ही दोन वाहने अडवली.

या वाहनांची झडती घेतली असता, त्यात प्रत्येकी दोन अशा एकूण ४ गुरांना अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयीपणे बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या वाहतुकीसाठी चालकांकडे कोणताही अधिकृत परवाना नव्हता. पोलिसांनी याप्रकरणी चालक अबरार जहुर शेख (वय २५) आणि सतिश कैलास थोरात (वय ३५), दोन्ही राहणार शिरपूर, जि. धुळे यांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत २ लाख १० हजार रुपयांची टाटा गाडी, २ लाख ५० हजार रुपयांची महिंद्रा सुप्रो आणि सुमारे ४७ हजार रुपये किमतीचे ४ गुरे असा एकूण ५ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अमळनेर पेालीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोई हे करीत आहे.


Protected Content

Play sound