मुंबई -वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने होणाऱ्या दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) परीक्षांच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांची जात नमूद करण्याचा निर्णय घेतला गेला असून याला आता विरोध होत आहे.
लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. यातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने होणाऱ्या दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) परीक्षांच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांची जात नमूद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शिक्षण मंडळाने शैक्षणिक प्रवाहाचे विश्लेषण करण्यासाठी जात नमूद करण्याचे कारण दिले आहे. परंतु अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होईल, असे सांगत याचा विरोध केला आहे.
दरम्यान यावर शिक्षण मंडळाचे अधिकारी म्हणाले की, “जात नमूद करण्याचा उद्देश फक्त सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची योग्य ओळख पटवणे आहे.”
“ही माहिती फक्त प्रशासकीय उपयोगासाठी आहे आणि याचा परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही,” असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. तथापि राज्यभरातील पालक संघटनांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी शिक्षण विभागाकडे याचिका दाखल केली जाणार असल्याचेही कळते.
तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, जात नमूद करणे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम करू शकते. शिक्षण क्षेत्रात समानता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळ यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.