Home उद्योग जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांचा सामंजस्य करार

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांचा सामंजस्य करार


 तिरुचिरापल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  भारतातील केळी उत्पादकांसाठी दिलासादायक पाऊल उचलत जळगावस्थित जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि आयसीएआर – राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (एनआरसीबी), तिरुचिरापल्ली यांच्यात नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. केळी पिकावर होणाऱ्या फ्यूजारियम विल्ट आणि क्युकुंबर मोजेक व्हायरस (CMV) या दोन प्रमुख रोगांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी करण्यात आलेला हा करार शेतकऱ्यांच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरणार आहे.

या सामंजस्य करारावर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन आणि जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर डॉ. सेल्वराजन यांनी जैन इरिगेशनकडून गेल्या ३५ वर्षांपासून केळी पिकावर सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करत, टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपनीने विषाणूमुक्त रोपे तयार करून उत्पादन व गुणवत्ता दोन्ही वाढविल्याचे सांगितले. मात्र, मागील काही वर्षांत फ्यूजारियम विल्ट व सीएमव्ही यांसारख्या रोगांमुळे केळी पिकांवर मोठे संकट आले असून, त्या पार्श्वभूमीवर या कराराचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

जैन इरिगेशन व एनआरसीबी यांच्या या करारामुळे केळीवरील रोग व्यवस्थापनासाठी संयुक्त संशोधनाला चालना मिळेल. संशोधनातून आधुनिक आणि प्रभावी रोग नियंत्रण पद्धती विकसित होतील, ज्या थेट शेतकऱ्यांच्या शेतात वापरता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होईल, उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. विशेषतः जळगावसह महाराष्ट्रातील प्रमुख केळी उत्पादक जिल्ह्यांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

डॉ. सेल्वराजन यांनी यावेळी पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलच्या माध्यमातून अशा सहकार्याने कृषी संशोधन अधिक गतीमान आणि उपयोगी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली. जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले तांत्रिक उपक्रम, विशेषतः टिश्यूकल्चर, हे आज जागतिक पातळीवर आदर्श मानले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कराराच्या निमित्ताने होणारे क्षेत्रीय संशोधन, प्रात्यक्षिके व प्रशिक्षण उपक्रम हे केवळ प्रयोगशाळापुरते मर्यादित न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील, हे निश्चित मानले जात आहे. कराराच्या वेळी डॉ. पी. गोविंदराज (ऊस संशोधन केंद्र संचालक), डॉ. अनिल पाटील व डॉ. एस. नारायणन (जैन इरिगेशन) उपस्थित होते.


Protected Content

Play sound