फडणवीस-अजित पवार पुन्हा भेटल्याने चर्चांना उधाण

 

fadanvis and pawar

सोलापूर, वृत्तसंस्था | राज्यात सत्ता स्थापनेवरील पेच मिटल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. पण यावेळी ही भेट जाहीर होती. निमित्त होते, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मंचावर एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी त्यांच्यात बराच वेळ गप्पाही सुरु होत्या. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. पण अखेर अजित पवार यांनीच आपल्यात काय बोलणे झाले याबद्दल खुलासा केला आहे.

 

अजित पवार यांनी सांगितले की, “संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारीच लावली असल्याने एकत्र बसलो होतो. यावेळी मी त्यांना हवा पाण्याबद्दल विचारत चौकशी केली”. अजित पवार सध्या बारामतीत कार्यकर्त्यांना भेटत असून यावेळी पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.

अजित पवारांना यावेळी उपमुख्यमंत्री पदाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी मला उपमुख्यमंत्री करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण ते ठरवण्याचा निर्णय हा त्या-त्या पक्षप्रमुखांचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळात खाते वाटपाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबद्दल मला विचारू नका, असेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच सिंचन घोटाळ्यासंबंधी मी बोलणार नाही, असेही ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले होते, मी काकांशी बोललोय : फडणवीसांचा खुलासा
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबरोबर केलेल्या सत्तास्थापनेबाबत शनिवारी मोठा खुलासा केला. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महिनाभर झालेल्या सत्तानाट्यावर वक्तव्य केले होते.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना अजित पवार यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केले होते. मात्र, अवघ्या ८० तासांमध्ये कोसळले. या निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, “काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणे शक्य नाही. भाजपासोबतच सरकार स्थापन केले पाहिजे, असे मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितले होते. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याशिवाय “आम्ही राष्ट्रवादीकडे गेलो नव्हतो तर अजितदादाच आमच्याकडे आले होते,” असा दावाही यावेळी त्यांनी केला होता.

Protected Content