जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक सभा आज अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, पोलीस तसेच पुरवठा शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांचेसह अशासकीय सदस्य डॉ. अर्चना पाटील, आत्माराम सूपडू कोळी, सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, पुरवठा विभागाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ काही ठिकाणी अपात्र व्यक्ती घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अपात्र लाभार्थ्यांनी आपली नावे स्वत:हून तात्काळ कमी करून घ्यावी व कारवाई टाळावी.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी मागील सभेत प्राप्त झालेल्या तक्रारींचाही आढावा घेतला. तसेच आजच्या बैठकीत अशासकीय सदस्यांकडून स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेतल्या. स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणाऱ्या शासकीय गोदामातील धान्याच्या वजनात येणारी घट व त्यावरील उपाय यावर सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. काही सदस्यांनी सर्व सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांवर दक्षता समिती सदस्यांचे भ्रमणध्वनीसह नावांचे फलक, धान्य वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम होण्यासाठी ऑप्रेटर संख्या वाढविणे, ज्या लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे उमटत नसतील अशा लाभार्थ्यांना मॅन्युअल पध्दतीने धान्य वितरण करण्याची सूट देण्याची परवानगी द्यावी. तसेच ग्रामसभा घेवून लाभार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या सूचना मांडल्या. अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी अशासकीय सदस्यांकडील सूचनांचा योग्य प्रकारे विचार करण्यात येईल. असे सांगून सर्व दुकानदारांनी लाभार्थ्यांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.