यावल, प्रातिनिधी | तालुक्यात येत्या २९ सप्टेंबरपासुन नवरात्रीच्या पावनपर्वास प्रारंभ होत असुन, या निमित्ताने येथील तहसील कार्यालयात महसुल व पोलीस प्रशासनाच्या वतीने दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कायदा अन सुव्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील तहसील कार्यालयाच्या दालनात या बैठकीला निवासी नायब तहसीदार आर.के. पवार व पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्री. पिंगळे यांनी सांगीतले की, मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी धार्मिक विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातुन समाजासमोर नवा आदर्श निर्माण करावा व विसर्जन मिरवणुकीत शिस्त, कायदा व सुव्यस्थेचे पालन करावे, यंदाच्या नवरात्रीचे पर्व हे आचारसंहितेच्या काळात येत असल्याने आपण सर्वांची कायदा सुव्यवस्था संदर्भात जबाबदारी अधिक वाढणार असुन यांचे भान प्रत्यकाने ठेवावे, आपल्या शहरातील मार्ग हा अत्यंत अरुंद असल्याने मिरवणुकीप्रसंगी दर्शनासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या माता-भगिनींना त्रास होणार नाही, याचीही काळजी मंडळाच्या कार्यकर्त्यांना घ्यावी, जो कुणी कायदा आणि सुव्यस्थेचे पालन करणार नाही, त्याची गय आमचे प्रशासन करणार नाही, मग तो कितीही मोठा व्यक्ती असो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावल तालुक्यात यंदा १८१ सार्वजनीक दुर्गात्सवमंडळे असुन १७ खाजगी दुर्गात्सव मंडळे सहभाग घेत आहेत.