नवी दिल्ली वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल रात्री विरोधी पक्षांची बैठक झाली असून यात महाआघाडीवर खलबतं करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीविरोधात महाआघाडी आकारास येण्याला आता वेग आला आहे. कालच अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन याला गती दिली. तर रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यात राहूल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह अन्य पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यातील चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी याप्रसंगी महाराष्ट्रातही महाआघाडी तयार करण्यात यावी यावर चर्चा करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या महाआघाडीत वंचित आघाडी, माकपा, स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि मनसे यांनाही सामावून घेण्यात यावी याला प्राथमिक पातळीवरील संमती देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यात भाजप व सेनेच्या युतीला महाआघाडीचे तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.