वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ

0
25
medical
medical


medical

मुंबई (वृत्तसेवा) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं २०१९-२० या वर्षाच्या वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी आरक्षण लागू करता येणार नाही, असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारनं वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंबंधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानं परीपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आश्वासन काल राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आझाद मैदानातून मागे हटणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्यामुळं वैद्यकीय आरक्षणाचा तिढा कायम होता. अखेर राज्य सरकारनं प्रवेश प्रक्रियेसंबंधी परिपत्रक काढून २५ मे पर्यंत मुदतवाढ देत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकची मुदतवाढ मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करण्याचा विचार आहे, असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. १३ मे पासून पुढील सात दिवस प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं. प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवार आणि पालकांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here