Home Uncategorized पातरखेडे आश्रमशाळेत गोवरचा शिरकाव : ४५ विद्यार्थ्यांना लागण

पातरखेडे आश्रमशाळेत गोवरचा शिरकाव : ४५ विद्यार्थ्यांना लागण


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोतल तालुक्यातील पातरखेडे येथील एकविरा माता आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेत गोवरचा (Measles) शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली आहे. आश्रमशाळेतील ३६१ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला गोवरची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, ४५ विद्यार्थ्यांना संशयित म्हणून वेगळे ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग तातडीने कामाला लागले असून, युद्धपातळीवर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल आरोग्य विभागाकडून १६ जुलै रोजी आश्रमशाळेत नियमित आरोग्य तपासणी सुरू असताना, दोन विद्यार्थ्यांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आली. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थ्याला गोवरची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. यानंतर, एरंडोलसह संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.

आरोग्य विभागाने युद्धपातळीवर कार्यवाही करत आश्रमशाळेतील सर्व ३६१ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. संशयित व लागण झालेल्या विद्यार्थ्यांना एरंडोल आणि जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना शाळेतच वेगळ्या खोल्यांमध्ये (आयसोलेट) ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी मयूर वाघ यांनी दिली.

दरम्यान, आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील गावांमध्ये घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. तसेच, गोवर आजाराबाबत जनजागृती करून नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर वाघ यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी शाळेतच तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तसेच उपचाराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.


Protected Content

Play sound