न्युयॉर्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे १० जून रोजी न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमोल काळे हे मूळचे नागपूर होत. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.
टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. काळे हे सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर गेले होते. सामना संपल्यानंतर अमोल काळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि अपेक्स काउन्सीलचे सदस्य सूरज सामंत यांच्यासह काळे यांनी रविवारी स्टेडियममधून टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा थरारक विजय पाहिला.
अमोल काळे हे मूळचे नागपूरचे होते. नागपुरातील अभ्यंकर नगर येथे त्यांचे घर आहे. अमोल काळे यांचा मुख्य व्यवसाय ईलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. त्याचबरोबर त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. अमोल काळे यांचे आई वडील हे पेशाने शिक्षक होते. ते नागपुरातील नूतन भारत विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते. अमोल काळे यांच्या परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी सुद्धा जवळचा संबंध आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अमोल काळे यांनी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या पॅनलकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. या निवडणूकीत काळे यांनी माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा पराभव केला. अध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केल्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले होते. काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू होते.