जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “जळगाव शहराच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” अशा कडक शब्दांत इशारा देत महापौर दीपमाला काळे यांनी आज, १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ७ वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक ५ मधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. महापौरांच्या या ‘सरप्राईज व्हिजिट’मुळे आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली.
पहाटेच हजेरी पुस्तकाची तपासणी
स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असताना महापौर दीपमाला काळे यांनी पहाटे सहा वाजता घराबाहेर पडत थेट आरोग्य कार्यालय गाठले. कार्यालयात येताच त्यांनी सर्वप्रथम हजेरी पुस्तकाची (मस्टर) तपासणी केली. पटावर नोंद असलेले किती कर्मचारी प्रत्यक्षात कामावर हजर आहेत आणि किती गायब आहेत, याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून येताच त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे आदेश
“जे कर्मचारी कामात कसूर करत असतील किंवा विनापरवाना दांड्या मारत असतील, त्यांची त्वरित नोंद घ्या. जळगाव शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त असणे अत्यावश्यक आहे. जर कर्मचारी सुधारत नसतील, तर मला कठोर भूमिका घ्यावी लागेल,” अशा शब्दांत महापौरांनी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना खडसावले.
व्यापारी संकुलांमधील अस्वच्छतेवर नाराजी
प्रभाग ५ मधील विविध मार्केट आणि व्यापारी संकुलांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापौरांकडे केल्या होत्या. याची दखल घेत त्यांनी प्रत्यक्ष परिसरात फिरून स्वच्छतेची पाहणी केली. “व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कचऱ्याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी मार्केटची स्वच्छता नियमित झालीच पाहिजे,” असे निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत नगरसेवक विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, मंगला चौधरी, महेश पाटील यांसह महापालिकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता आरोग्य विभागात खळबळ उडाली असून स्वच्छतेच्या कामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.



