Home Cities भुसावळ भुसावळच्या पाणी प्रश्नावरून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व संतोष चौधरींचा जोरदार हल्लाबोल

भुसावळच्या पाणी प्रश्नावरून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व संतोष चौधरींचा जोरदार हल्लाबोल


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील पाणी प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना आज नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने केलेल्या आरोपांचे खंडन करत या प्रकरणी सत्य सांगितले. याप्रसंगी त्यांनी भाजपवर कडाडून टिका केली.

भुसावळातील पाणी प्रश्न पेटला असून या प्रश्नावरून भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. यात त्यांनी तीन महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचे काम बंद पडल्याचा आरोप केला. यावरून मंत्री सावकारे यांनी हे काम कुणी तरी फोन करून बंद केल्याचा आरोप काल केला आहे. तर आज नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडले.

याप्रसंगी गायत्री भंगाळे म्हणाल्या की, दीर्घ काळापासून सत्तेत असणाऱ्यांना मुख्याधिकारी आणि शहरातील समस्या दिसल्या नाहीत. तथापि, आता निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना हे सर्व आठवले असून ते माझ्यासह मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. तसेच ते पाणी पुरवठ्याबाबत अफवा पसरवत आहेत. मात्र हा दबाव मी सहन करणार नाही. तर, असेच कायम राहिले तर आपण पोलीसात तक्रार करून गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा देखील गायत्री भंगाळे यांनी याप्रसंगी दिला.

या संदर्भात संतोष चौधरी म्हणाले की, सावकारे हे कितीही म्हणत असले की कुणाच्या फोनमुळे पाण्याच्या टाकीचे काम बंद पडले ! तरी ते सपशेल खोटे आहे. यातील तांत्रीक अडचणी दुर करून हे काम करणे प्रशासनाला अपेक्षित आहे.

संतोष चौधरी पुढे म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीचा निकाल 22 डिसेंबर रोजी लागला आणि गायत्रीताई भंगाळे यांनी 24 डिसेंबर रोजी कार्यभार हाती घेतला. यामुळे काम जर तीन महिन्यांपासून बंद असेल तर यासाठी कोण जबाबदार ? याचे उत्तर भाजप नगरसेवकांनी शोधावे. नवीन नगराध्यक्षा अल्प काळात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाऊल टाकत असून भुसावळकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार असून आमचे काम सुरू आहे.

याप्रसंगी संतोष चौधरी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, आठवडे बाजारातील जागा ही व्यापारी संकुलासाठी योग्य असून देखील येथे पाण्याची टाकी बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. या टाकीच्या कामाची माती ही संतोषी माता सभागृहाच्या जवळच्या जागेवर टाकली जात असून ती जागा पचविण्याचे काम एक पदाधिकारी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अमृत-2 योजनेतील 100 कोटी रूपये हे आपल्या समर्थकाला मिळावे यासाठी देखील मंत्र्यांचा आटापीटा सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, भुसावळकर जनतेला पाणी प्रश्नावरून राजकारण नको आहे, त्यांना रिझल्ट म्हणजेच वेळेवर शुध्द पाणी हवे आहे. गायत्री भंगाळे यांनी आपल्या कारकिर्दीतील अवघ्या काही दिवसांमध्येच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठाम पाऊल टाकल्यामुळे भुसावळकर जनता खूप खुश आहे. यात कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा देखील त्यांनी याप्रसंगी दिला. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतोद उल्हास पगारे यांनी भुसावळ शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या मागे कोणती अदृश्य शक्ती कार्यरत आहे याचा शोध घ्यावा असा टोला भाजपला मारला.

या पत्रकार परिषदेला संतोष चौधरी यांच्यासह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, गटनेते सचिन चौधरी, उपगटनेते सोहेल खान पठाण, प्रतोद उल्हास पगारे, मुख्य समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे, नगरसेवक अकिल पिंजारी, सिकंदर खान, अमीन कुरेशी, सचिन पाटील, इम्रान बागवान, नदीम मेंबर यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.


Protected Content

Play sound