Home Cities जळगाव स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना पाठबळ देण्याचे महापौरांचे आवाहन

स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना पाठबळ देण्याचे महापौरांचे आवाहन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जळगाव महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘खान्देश महोत्सव २०२६’ ला उद्यापासून उत्साहात सुरुवात होत असून, जळगावकरांनी या महोत्सवाला कुटुंबासह भेट देऊन बचत गटांच्या उत्पादनांना पाठबळ द्यावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.

जळगाव महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सागर पार्क येथे दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पार पडणार आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून, गुरुवारी सायंकाळी ६ वाजता राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात खान्देशाच्या समृद्ध संस्कृतीचे, परंपरेचे आणि खाद्यवैविध्याचे दर्शन घडणार आहे. या महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स उभारण्यात आले असून, महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती उपयोगाच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, सजावटीच्या वस्तू तसेच खान्देशी पारंपरिक शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

नागरिकांच्या मनोरंजनासाठी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, विजेत्यांना पैठणी, राणीहार आणि आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय स्थानिक गायक, नृत्य गट आणि कलावंतांचे सादरीकरण, लहान मुलांसाठी गेम झोन तसेच जादूगाराचे प्रयोग यामुळे महोत्सवात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी आणि महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound