औरंगाबाद । बहुचर्चित ‘तीस-तीस’ घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोडला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी त्याला त्याच्या कन्नड येथील घरातून ताब्यात घेतलं आहे.
कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने शेतकऱ्यांसाठी आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीची एक योजना आणली. मासिक 30 टक्के परतावा मिळवून देतो, असे सांगण्यात आले. सुरुवातीला संतोषने शेतकऱ्यांना परतावाही दिला, त्यामुळे लोकांनी घरं, जमिनी विकून त्याच्याकडे पैसे गुंतवले. मात्र वर्षभरापासून शेतकऱ्यांना व्याज नाही आणि मुद्दलाचे पैसेही परत मिळालेले नाहीत.
अखेर संतोष राठोड विरोधात शुक्रवारी दौलत राठोड नावाच्या व्यक्तीने आपली ३३ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. ज्यात कृष्णा एकनाथ राठोड आणि पंकज शेषेराव चव्हाण यांनी संतोष राठोड याच्या तीस-तीस योजनेत पैसे टाकल्याचे सांगून,यावर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र वर्ष उलटत आले पैसे परत मिळत नसल्याने दौलत राठोड यांनी तक्रार दिली.
गुन्हा दाखल होताच बिडकीन पोलिसांनी संतोष राठोडचा शोध घेतला असता तो आपल्या कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच पोलिसांनी संतोष राठोड याच्या घराला घेरा घालत अटक करण्यात आली आहे. तर आज राठोड याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.