जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील देवराम नगरात बुधवारी मध्यरात्री एका बंद घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील फर्निचर, संसार उपयोगी वस्तू आणि इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र लोखंडे यांच्या मालकीचे देवराम नगरातील घर गेल्या काही दिवसांपासून बंद होते. लोखंडे हे या घरात अधून-मधून वास्तव्याला येत असत. बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अचानक या घरातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. घरासमोर राहणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

नागरिकांनी तातडीने जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग शेजारील घरांपर्यंत पसरली नाही. मात्र, तोपर्यंत घरातील सोफा, कपाट, फर्निचर आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जळून कोळसा झाल्या होत्या.
घरात कोणीही राहत नसल्याने ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने, घर बंद असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून आगीच्या नेमक्या कारणाचा अधिक तपास केला जात आहे.



