जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील जी-३ सेक्टरमध्ये असलेल्या आईसक्रीम, चॉकलेट, मिरची पावडर, चिप्स, मसाले या खाद्यपदार्थ ठेवलेल्या शीतगृहाच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याने अंदाजे सुमारे २० लाख रूपयाचे मोठे नुकसान झाल्याची घटना १ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे.
औद्योगिक वसाहत परिसरातील जी-३ सेक्टरमध्ये घाऊक व्यापारी राजेश कोठारी यांचे शीतगृह, गोदाम आहे. शहरातील किरकोळ विक्रेत्यांना विविध खाद्य पदार्थांचा पुरवठा ते करतात. रात्री गोदाम बंद करून कोठारी हे घरी गेलेले असताना सोमवारी १ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता सुमारास गोदामातून अचानक धूर येत असल्याचे सुरक्षा रक्षकाला दिसले. त्यावेळी त्याने लगेच कोठारी यांना याविषयी माहिती दिली. ते घटनास्थळी पोहचले व पाठोपाठ अग्नीशमन दलाचे बंबही दाखल झाले. मात्र आग एवढी होती की त्यात सर्व जळून खाक झाले. आग लागल्यानंतर महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे दोन बंद १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्याद्वारे फायरमन भरत बारी, पन्नालाल सोनवणे, नीलेश सुर्वे, मनोज पाटील, विजय पाटील, निवांत इंगळे, नंदू खडके यांनी ही आग विझवली. ही आग विझविण्यासाठी जवळपास दीड तास लागला. नुकसानीचा आकडा वाढू शकतो. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.