Home आरोग्य जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर; नागरिकांना सहभागाचे आवाहन

जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर; नागरिकांना सहभागाचे आवाहन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील गुरुकुल कॉलनी येथे सामाजिक बांधिलकी जपत ८ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गुरुकुल कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडणार असून रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सामाजिक कार्याच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्ताची मदत मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हे रक्तदान शिबिर इंडियन रेडक्रॉस जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. शिबिरात प्रमुख उपस्थित डॉक्टर म्हणून डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी व त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. तसेच डॉ. नरेंद्र सोनार यांचीही उपस्थिती राहणार असून रक्तदान प्रक्रियेचे मार्गदर्शन व वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. विनोद शहा, ललित भारंबे आणि ममता शहा यांचे सहकार्य लाभत आहे. गुरुकुल कॉलनी केंद्रातील सर्व सेवेकरी शिबिर यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. या उपक्रमात केंद्र प्रतिनिधी सुनंदा चौधरी तसेच पंच कमिटी सदस्य सुभाष चौधरी, दिलीप इंगळे, जितेंद्र फालक, भारती पाटील आणि सेजल चौधरी आदी सेवेकरी सहभागी होणार आहेत.

हे रक्तदान शिबिर गुरुकुल कॉलनी, क्राऊन बेकरीच्या मागे, सेंट जोसेफ स्कूलजवळ, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. रक्तदानासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. आपल्यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात या भावनेतून नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३१४८७२१ आणि ९८९०४८४१३६ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound