नवी दिल्ली, वृत्तसंस्था | जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आजाराशी झुंजत आहे. परिणामी जैशच्या कारवायांची सूत्रे आता त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगरच्या हाती आहेत. अजहरची पाकिस्तानने तुरुंगातून गुपचूप सुटका केल्याचे वृत्त काल पसरले होते. तो आजारी असल्यानेच त्याला जेलमधून बाहेर काढल्याचे म्हटले जात आहे.
मसूद अजहरला याच वर्षी संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. भारत सरकारनेही यूएपीए कायद्यांतर्गत त्याला दहशतवादी घोषित केले आहे. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजहर किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. पाकिस्तानातील बहालवपूर येथे जैशचे दोन प्रमुख अड्डे आहेत. मरकज उस्मान ओ अली आणि मरकज सुभान अल्लाह अशी या ठिकाणांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद त्याच्या संघटनेच्या दैनंदिन कामकाजावर तब्येतीमुळे सध्या लक्ष ठेवत नाही, मात्र तरुणांना जिहादच्या मार्गावर जाण्यासाठी भडक भाषणे देण्याचे काम तो अजूनही करतो. त्याच्या रेकॉर्डेड भाषणांचा यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. यावर्षी मार्चमध्ये पाकिस्तानने त्याला अटक केली होती. मात्र हा जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.