
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पैशांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ करत मारहाण केल्याप्रकरणी जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षदा तुषार पाटील (वय २८), या पिंप्राळा येथील रहिवासी असून त्यांचा विवाह मध्यप्रदेशातील भोपाळ येथील तुषार रवींद्र पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर हर्षदाला माहेरून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. इतकेच नाही, तर सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही हर्षदाने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
हा असह्य त्रास सहन न झाल्याने हर्षदा आपल्या माहेरी पिंप्राळा येथे परतल्या. त्यानंतर त्यांनी गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीनुसार, पती तुषार रवींद्र पाटील, सासरे रवींद्र भगवान पाटील, सासू छाया रवींद्र पाटील, तसेच नातेवाईक सावंत भगवान पाटील, आकांक्षा सावंत पाटील, अर्चना गणेश पाटील, गणेश विष्णू पाटील (सर्व रा.भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ इरफान मलिक करत आहेत.



