Home Cities जळगाव गुढी पाडव्याच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली 

गुढी पाडव्याच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी जळगाव शहरातील बाजारपेठ सध्या रंगतदार झाली असून गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पारंपरिक गुढ्या, साखरेचे हार, कंगण आणि भगवे ध्वज यामुळे बाजारात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील विविध भागांतील बाजारपेठांमध्ये छोट्या आकर्षक गुढ्यांची विशेष रेलचेल दिसून येत आहे. यंदा बाजारात उपलब्ध असलेल्या गुढ्यांमध्ये लाल व भगव्या रंगातील कृत्रिम फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, तांब्याचा कलश, आंब्याची पाने व नारळाने सजवलेले मंगल स्वरूप ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या गुढ्यांच्या किंमती ११० रुपयांपासून ते ३४० रुपयांपर्यंत असून ग्राहक त्यांची उत्साहाने खरेदी करत आहेत. गुढीसाठी लागणाऱ्या भरजरी काठाच्या छोट्या साड्यांनाही मोठी मागणी असून गुलाबी, मोरपंखी आणि जांभळ्या रंगांच्या साड्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत.

गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या काठ्यांचीही विक्री जोरात सुरू असून घराघरांवर भगवा ध्वज लावण्याची परंपरा जपण्यासाठी नागरिकांकडून ध्वजांची खरेदी केली जात आहे. प्रभू श्रीरामाचे चित्र असलेले भगवे ध्वज यंदा विशेष आकर्षण ठरत असून विविध आकारात ते उपलब्ध आहेत, अशी माहिती व्यावसायिक अमर चौरसिया यांनी दिली.

दरम्यान, गुढीसाठी लागणारे साखरेचे हार, कंगण आणि नारळ यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. साखरेचे हार २० रुपयांपासून उपलब्ध असून लहान मुलांमध्ये त्यांचे विशेष आकर्षण आहे. ग्राहकांकडून या साहित्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेते दीपक पवार यांनी सांगितले.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने सामाजिक व धार्मिक उपक्रमांनाही वेग आला आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने १९ मार्च रोजी शहरातील विविध भागांमध्ये सामूहिक गुढी पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. चौघुले प्लॉट, महर्षी वाल्मीकि चौक, लक्ष्मीनगर, ज्ञानदेव नगर, पांझरापोळ चौक, के. सी. पार्क, मयूर कॉलनी, मेहरूण, छत्रपती शिवाजीनगर, सुप्रीम कॉलनी, पिंप्राळा, श्रीधर नगर, श्रीराम नगर, व्यंकटेश नगर आणि देवीदास कॉलनी या ठिकाणी हे उपक्रम पार पडणार असून यावेळी पर्यावरण संरक्षण व निरोगी जीवनशैलीचा संकल्प नागरिकांकडून घेतला जाणार आहे.

याशिवाय, जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज नाणीज धामतर्फे १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता भव्य स्वागत शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. चिमुकले श्रीराम मंदिर येथून सुरू होणारी ही शोभायात्रा टॉवर चौक, महापालिका, चौबे शाळा, सराफ गल्ली मार्गे ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे समाप्त होणार आहे. या शोभायात्रेत सजीव आरास, पारंपरिक वाद्ये, भगवे ध्वज आणि लेझीम पथकांचा सहभाग असणार आहे.


Protected Content

Play sound