यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बिअर बारच्या दुकानाचे लायसन्स घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील गणपती नगरातील बाहेर असलेल्या जयश्री गोपाल चौधरी यांचा विवाह जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील गोपाल धनराज चौधरी यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला होता. लग्नाचे दोन महिने सुरुवातीला चांगले गेल्यानंतर पती गोपाल चौधरी याने विवाहितेला मानसिक त्रास देवून तुझ्या वडिलांकडून बियर बार दुकानासाठी तसेच दुकानाच्या लायसन्ससाठी १० लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्यामुळे तिला मारझोड, शिवीगाळ करणे असा छळ सुरू झाला. दरम्यान या पैशांसाठी तिचे सासरे, सासू, दीर यांनी देखील त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. मंगळवारी २८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती गोपाल धनराज चौधरी, सासरे धनराज गजमल चौधरी, सासू कल्पनाबाई धनराज चौधरी, जेट योगेश धनराज चौधरी, दीर राहुल धनराज चौधरी सर्व रा. गारखेडा ता. जामनेर यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बालक धना बऱ्हाटे करीत आहे.