मराठा आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

udhdhav thakaray

मुंबई वृत्तसंस्था । आरे, नाणार आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांनंतर आता मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. दरम्यान मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्यासाठी सत्तेतील आमदार व खासदारांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन दिले आहे.

याप्रकरणी शिंदे पुढे म्हणाले की, “मागील 5 वर्षात झालेल्या नाणार आंदोलन, शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन अशा सर्वच आंदोलनांमधील गुन्ह्यांचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. या बैठकीत आधी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची आणि त्यातील अडथळ्यांची माहिती घेण्यात आली. मी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत निर्देशही दिले आहेत. निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही.” मराठा आंदोलनातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होणार असून त्यानंतरच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Protected Content