जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करून तत्कालीन एलसीबीचे निरिक्षक किरण बकाले याला फरार होऊन एक वर्ष झाले तरी अटक करण्यात न आल्यामुळे आज जळगावात मराठा सन्मान यात्रेच्या अंतर्गत एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण करण्यात आले. यात बकालेच्या अटकेच्या मागणीसाठी आता थेट दिल्लीत जंतर-मंतरवर उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
या संदर्भातील वृत्त असे की, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन एलसीबीचे निरिक्षक किरण बकाले यांनी महिलांविषयी केलेले वक्तव्य हे समाजमाध्यमांमधून व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली होती. यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रक्षोभ उसळला होता. बकाले याला निलंबीत करण्यात आल्यानंतर तो फरार झाला होता. या घटनेला एक वर्ष झाले. दरम्यान, त्याच्या विरोधात अनेकदा आंदोलने करून देखील काहीही उपयोग झाला नाही. अगदी मुख्यमंत्र्यांनी देखील बकालेस तात्काळ अटक करण्याचे निर्देश देऊन देखील काहीही कार्यवाही झालेली नाही. या घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आत्मसन्मान मोहिमेच्या अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाक्षणीक उपोषण करण्यात आले.
या आंदोलनात राज्यभरातून मराठा समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच लक्षणीय बाब म्हणजे अन्य समाजातील मान्यवरांनी देखील भेट देऊन याला पाठींबा व्यक्त केला. सकाळी अकरा वाजता आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत किरण बकालेसह त्याच्या पाठीराख्यांचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून किरण बकालेस तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तर आंदोलनाच्या समारोपाला अशोकराव शिंदे यांनी आपल्या भाषणातून घणाघाती टिका केली. ते म्हणाले की, तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनुसार बकालेवर गुन्हा दाखल झाला. तरी पोलीस खात्याकडून त्याची पाठराखण करण्यात आली. याचमुळे एक वर्ष उलटूनही त्याला अटक करण्यात आलेली नाही. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्यात सहा वेळेस येऊन गेले. त्यांची आम्ही भेट घेतली असता त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. तथापि, अद्याप देखील कार्यवाही झालेली नाही. जळगाव जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी याबाबत पहिल्यांदा आवाज उठविला असला तरी नंतर त्यांचा आवाज बंद झाला. यामुळे त्यांना समाजाच्या आत्मसन्मानाशी काहीही देणेघेणे नसून त्यांना फक्त मराठ्यांची मतेच हवी आहेत का ? असा सवाल अशोक शिंदे यांनी उपस्थित केला.
किरण बकाले याच्या पाठीशी पोलीस प्रशासनासह राजकीय पाठबळ असल्यामुळे त्याला अटक करण्यात येत नसल्याचा आरोप अशोक शिंदे यांनी केला. या प्रकरणी आता मराठा समाज गप्प बसणार नसून या पुढील लढाई ही आता थेट राष्ट्रीय पातळीवर नेणार असल्याची घोषणा त्यांनी केला. या अनुषंगाने महात्मा गांधी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात येणार असून यात समाजातील देशभरातील मान्यवर सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या आंदोलनात किरण बकाले फरार होण्यास एक वर्ष झाल्याने याबाबत केक कापून उपहासात्मक पध्दतीत सरकारचा निषेध करण्यात आला. तर यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन प्रदान करण्यात आले. यात किरण बकालेस तात्काळ अटक करून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात लखुजीराजे जाधव ह्यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे सर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्करराव काळे, अभियंता प्रकाशदादा पाटील, वढू तुळजापुरचे संकल्पकार शँभु चरित्रकार व्याख्याते शेखर पाटील, माजी जिल्हा बँक संचालक वाल्मीक पाटील, कैलास पाटील, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख रमेश माणिक पाटील, पुण्याचे पैलवान हगवणे, दिनाभाऊ पाटील, भुसावळचे माजी नगरसेवक संजयआवटे, नितीन चौबे, छावा अध्यक्ष प्रमोद पाटील,संजय सपकाळे, शिक्षक आघाडी अध्यक्ष प्रवीण जाधव, सेवानिवृत्त डीवायएसपी शामकांत सोमवंशी, लहुजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्री अंभोरे, मनोज जरांगे पाटील यांचे मार्गदर्शक श्री चव्हाण; जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख,गाडी लोहार अध्यक्ष श्री सांगोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रविंद्र देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे किरण बोरसे, डॉ. धनंजय बेंद्रे, डॉ. गणेश पाटील, महेश पाटील, विजय बांदल, आदिवासी ठाकूर समाज जिल्हाध्यक्ष मुन्ना ठाकूर, आनंदराव मराठे, स्वप्नील कोतकर आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
खालील व्हिडीओत पहा या आंदोलनाची क्षणचित्रे !
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/637391475221496
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/923290062676316